
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)।
नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गत वर्षभरात पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच अभिनव उपक्रम राबविले. तसेच हरविलेल्या आणि अपहरण झालेल्या २१० मुली आणि ४५ मुलांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्ह्यात नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. अशा परिस्थितीत पोलिस दलाने वाळूमाफियांच्या विरोधात आघाडी उघडून वर्षभरात
३६९ गुन्हे दाखल करुन ८० कोटी ६८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटखा बाळगणाऱ्या ५७ जणांवर गुन्हा दाखल करुन सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अवैध दारु विक्री करणाऱ्या ३ हजार १५० जणांवर गुन्हे दाखल करुन १ कोटी २० लाख रुपयांचा दारु साठा जप्त केला.
अवैधपणे चालणाऱ्या जुगारावर धाडी मारून ९४२ गुन्हे दाखल करीत ८४ लाख रुपये जप्त करण्यात आले.
२०२५ या वर्षात १९ दरोड्यांच्या गुन्ह्यात १ कोटी १२ लाखांचा मुद्देमालापैकी ७५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल परत मिळाला.
जिल्ह्यात गुन्हेगारांवर अंकुश बसावा म्हणून गेल्या वर्षभरात एमपीडीए आणि हद्दपारीच्या कारवाईचा धडाका लावण्यात आला . यावर्षी ४१ जणांना एक वर्षासाठी तुरुंगात पाठविण्यात आले आहे. २ हजार ५८६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर पाच जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.
महिला साहाय्य कक्षाकडे वर्षभरात तब्बल १ हजार ८५ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी १ हजार ७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. पती-पत्नीमध्ये आलेला दुरावा मिटविण्यासाठी पोलिसांनी अनेकांचे समुपदेशनही केले.
रामतीर्थ, तामसा, सिंदखेड, भाग्यनगर व नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत महिला अत्याचाराच्या संदर्भाने गुन्ह्यात पोलिसांनी २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis