
सुकमा–बीजापूरमध्ये सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
रायपूर, 03 जानेवारी (हिं.स.) : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बस्तर रेंजमध्ये राबवण्यात आलेल्या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एकूण 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांकडून एके-47, आयएनएसएएस आणि एसएलआर रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील कोंटा–किस्ताराम परिसरातील जंगलात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले, तर बीजापूर जिल्ह्यात 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दक्षिण छत्तीसगडमध्ये सशस्त्र नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई सुरू केली होती.या मोहिमेसाठी डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड)च्या विशेष पथकांना दक्षिण बस्तर परिसरात रवाना करण्यात आले होते. बीजापूर जिल्ह्यात सकाळी सुमारे 5 वाजल्यापासून तर सुकमा जिल्ह्यात सकाळी 8 वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता. शोधमोहीमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणांहून 14 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) आकाश राव यांच्या हत्येत सहभागी असलेले काही कुख्यात नक्षलवादीही होते. तसेच या चकमकीत नक्षलवादी कमांडर मंगडू ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृत नक्षलवाद्यांमध्ये कोंटा एरिया कमिटीचा एसीएम हितेश याचाही समावेश आहे.या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी स्वतः केले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या कारवाईचे कौतुक करत नक्षलवादाविरोधातील लढ्यातील हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी