
नाशिक , 03 जानेवारी (हिं.स.)।
अभाविप ही राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांची संघटना आहे. अभाविप - रा. स्व. संघाच्या संस्कारांमुळेच माझ्यातील कार्यकर्ता नेता घडला. आगामी काळातही शिक्षा-संस्कार-पर्यावरण आदी अनेक विषयात युवकांनी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६० व्या हिरक महोत्सवी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनांचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज (अमरावती ) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी महाजन बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, प्रदेशाध्यक्ष प्रा. बागेवाडी, अधिवेशन स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर, सचिव सागर वैद्य, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी, प्रा. प्रदीप वाघ, व्यंकटेश अवसरकर आदी उपस्थित होते.
यावेळी महाजनांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील अभाविपच्या कामाच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळचे संघटनमंत्री, शिबिरे, राष्ट्रभक्तीपर गीते आठवली. आयुष्यातील पाहिली निवडणूक स्टूडेंट कौन्सिलच्या अभाविप कडून लढलो. उत्कृष्ट खेळाडू, पैलवान असल्याने तेव्हापासून निवडणूका जिंकण्याचे डावपेच शिकलो ते आजपर्यंत उपयोगी येताय. आयुष्यात एकही निवडणूक हरलो नाही. अपराजित राहण्याचा माझा विक्रम अबाधित आहे. अभाविपमुळे समाजाच्या संकटकाळात मदतीला धावून जाण्याचा नीडर स्वभाव तयार झाला. आयुष्यभर निर्व्यसनी राहिलो म्हणून लोक मला फिटनेसचा आदर्श मानता..
जितेंद्रनाथ महाराज यांनीही अभाविपच्या कार्यकर्ता जीवनातील आठवणी सांगितल्या. अभाविपसारखी राष्ट्रभक्त संघटना आहे. तोपर्यंत देश सुरक्षित आहे. अभाविपने राजकारणातच नाही तर समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, साहित्य, उद्योग प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व दिले आणि लाखो राष्ट्रभक्त नागरिक घडवले असे गौरवोद्गार काढले.
प्रदेशमंत्री कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात छात्र संघ निवडणुका पुन्हा सुरू कराव्या अशी मागणी महाजनांकडे केली. प्रा. बागेवाडी यांनी अभाविप कामाचा विस्तार आणि सद्यस्थिती मांडली.
कार्यक्रमाला अभाविपचे एक हजार कार्यकर्ते, नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, रा. स्व. संघाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन अधिवेशन स्थळी रमले. भगवे वातावरण, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभक्तीपर घोषणा-गीते उत्साहामुळे १ तासासाठी आलेले कुंभमेळा मंत्री तब्बल ३ तास रमले. भोजनकक्षात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. स्वतःही रांगेत उभे राहून थाळी घेतली आणि बसून भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी महाजनांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आदिवासी जीवन दर्शन करणाऱ्या प्रदर्शनीचीही पाहणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV