
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
सध्याचे राजकारण चांगलच बदलले आहे.. अमाप पैसा, ताकद आणि वंशातील लोकांचाच राजकारणात बोलबाला आहे.. मात्र याला अपवाद ठरलं आहे.. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब घरातील तरुणाला थेट नगरसेवकपदाची उमेदवारी दिली असून, ही बाब सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे.
अकोल्यातील खडकी भागात एक भाड्याच्या घरात राहणारं हे कुटुंब आज अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचं काम करणाऱ्या मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवकपदाचा उमेदवार होऊ, याची कल्पनाही नव्हती. मात्र, भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. म़ंगेशला प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून संधी देण्यात आली आहे. मंगेश हा अकोल्यातील खडकी भागात महावितरणचं वीज बिल वाटप करणारा सामान्य होता. मात्र, 30 डिसेंबरनंतर त्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि तो थेट महापालिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला.
मंगेश झिनेचं कुटुंब हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतील आहे.. मंगेशची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाचा संसार चालवते, तर वडील चौकीदारीचं काम करून उदरनिर्वाह करतात. मात्र भाजपने आपली दखल मंगेशला उमेदवारी दिल्याने त्यांना सुखद धक्का मिळाला..
मंगेश सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा, त्यामुळे अनेकांनी मंगेशला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.. मंगेशला पूर्ण साथ मिळणार आहे.. मंगेशच्या प्रचारासाठी लोकवर्गणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे..तर दुसरीकडे भाजपने मंगेश झिने यांना उमेदवारी देताना पक्षातील चार वेळा नगरसेवक राहिलेले विजय इंगळे यांचं तिकीट कापलं. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
अनेकांसाठी राजकारण हे सोयीचे नसून राजकारणात जाणे देखील काही जन टाळतात.. राजकारण एक धंदा होऊन बसल्याचा आरोपही करण्यात येतो.. मात्र अकोल्यातील मंगेश हे उदाहरण याला अपवाद ठरलं आहे..अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या मंगेश झिने यांची उमेदवारी ही केवळ एक राजकीय घटना नसून, उपेक्षितांना संधी देणाऱ्या लोकशाहीचं जिवंत उदाहरण असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे