
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांना कानमंत्र देण्याचे सत्र सुरू आहे. मात्र शिंदे सेनेच्या माजी आमदाराच्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यात उमेदवारांना मार्गदर्शन करताना वादग्रस्त विधान केलं आहे. “ज्येष्ठ नागरिकांना काम नसतं, ते दिवसभर रिकामे असतात, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा” असा सल्ला त्यांनी दिला.अनुभव, शहाणपण आणि संस्कारांची शिदोरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ‘रिकामे’ ठरवणं ही राजकीय मानसिकतेची खालावलेली पातळी दर्शवत आहे.एकीकडे निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांची मतं महत्त्वाची आणि दुसरीकडे त्यांच्याविषयी अशी अवमानकारक भाषा— हा दुटप्पीपणा उघड झाल्याचंही दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे