
अकोला, 03 जानेवारी (हिं.स.)।
'ॲसेस टू जस्टीस' प्रकल्प व आय.एस.डब्ल्यू.एस. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिवस आणि स्त्री मुक्ती दिनानिमित्त कान्हेरी सरप येथे भव्य जनजागृती कार्यक्रम व नि:शुल्क शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून 'बालविवाह मुक्त अकोला जिल्हा' करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी घोषित केलेल्या १०० दिवसीय अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.
गीतांजली विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथून रॅलीची सुरुवात झाली. 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' आणि 'बेटी मेरी अभी पढेंगी, विवाह की सूली नहीं चढेंगी' अशा घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला. रॅलीमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कायदेविषयक मार्गदर्शन: रॅलीचा समारोप ग्रामपंचायत कार्यालयात झाला. यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल तस्करी, बाल मजुरी आणि बाल लैंगिक शोषण या विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी 'बालविवाह मुक्त भारत' करण्याची शपथ घेतली. तसेच बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड लाईन १०९८ वर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले.
वंचित घटकांसाठी आयोजित या कॅम्पमध्ये पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, पीएम विश्वकर्मा कार्ड, बांधकाम कामगार योजना, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड आणि रेशन कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे नि:शुल्क काढून देण्यात आली.
या कार्यक्रमाला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थ ॲड. मीनल खंडारे, सरपंच सुनील ठाकरे व ग्रामपंचायत अधिकारी शिवदास गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, पूजा पवार, पूजा मनवर, राजश्री कीर्तिवार, रवींद्र सावरकर, शैलेजा विखोरे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गीतांजली शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे