
मनमाड, 03 जानेवारी (हिं.स.)।
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मूर्तीवरील मौल्यवान दागिन्यांसह समोरील चांदीच्या मुषकावर (उंदीर) डल्ला मारला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी चोरीसाठी मंदिराची मागील बाजू निवडली होती. तेथील पत्रा उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर असलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदीच्या मुषकाची त्यांनी चोरी केली. हा सर्व थरार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मनमाड शहरातील मनमाड नगर परिषदेच्या मागील बाजूला असलेल्या आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या इच्छामणी चांदीच्या गणपती मंदिरात काल पहाटे साडे तीन चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारला गणपती मंदिराच्या मागील बाजूला असलेला पत्रा उचकटून चोराने आत प्रवेश केला व गणपतीची सोन्या चांदीची आभूषणे चोरुन नेली चोरट्यांने गणपतीची सोंड देखील सूक्ष्म हत्याराने तोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला चोरट्यांने मंदिरात असलेली दान पेटी देखील फोडली व त्यातील रोख रक्कम देखील चोरुन नेली घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून लागलीच अधिकारी वर्गाला सूचना करून तपास सुरू केला आहे.या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त केला जात असुन पोलिसानी गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मंदिराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.
शहरात संताप
भरवस्तीत असलेल्या आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरी झाल्याने मनमाड शहरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिक आणि ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.या घटनेमुळे शहरातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV