रायगड - ग्रामपातळीवर सक्षम कार्यकर्ते घडविण्यासाठी ग्राममित्र प्रशिक्षणाचा शुभारंभ
रायगड, 3 जानेवारी, (हिं.स.)। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी “ग्राममित्र प्रशिक्षण” कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई
ग्रामपातळीवर सक्षम कार्यकर्ते घडविण्यासाठी ग्राममित्र प्रशिक्षणाचा शुभारंभ


रायगड, 3 जानेवारी, (हिं.स.)। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी “ग्राममित्र प्रशिक्षण” कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन करत या प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण भागात सक्षम, जाणकार आणि संवेदनशील कार्यकर्ते घडवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

बांधणवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुवर्णा दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन सत्रात ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, आरोग्य यंत्रणा तसेच माहिती अधिकार यांसारख्या शासकीय व प्रशासकीय यंत्रणांची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच लेखन, वक्तृत्व, नेतृत्व आणि संवादकौशल्य यांचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ग्रामस्तरावर सक्षम कार्यकर्ता घडावा या उद्देशाने ग्राममित्र प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली असून या प्रशिक्षणात रायगड भूषण संतोष ठाकूर (अध्यक्ष, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था), सामाजिक कार्यकर्ते उदय गावंड आणि ग्राममित्र समन्वयक राजेश रसाळ मार्गदर्शन करणार आहेत. या पहिल्या टप्प्यात ३३ ग्राममित्र प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने आहे. प्रत्येक रविवारी हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

उद्घाटन सत्रात बोलताना पत्रकार सुवर्णा दिवेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांचा संदर्भ देत महिलांनी समाजविकासाच्या या प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी व्हावे, शासकीय कामकाज आणि योजनांची माहिती करून घेऊन स्वतः सक्षम व्हावे, असे आवाहन केले. तसेच प्रशिक्षणादरम्यान किंवा जिल्हा पातळीवर शासकीय कार्यालयीन कामांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात संतोष ठाकूर यांनी गावपातळीवर वाढत चाललेली राजकीय मक्तेदारी आणि गटतट यामुळे सर्वसमावेशक विकासाला अडथळे येत असल्याचे नमूद केले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्राममित्र प्रशिक्षणातून घडणारे कार्यकर्ते सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande