
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील कांदेवाडी येथे संत भगवानबाबा जयंती व नववर्षानिमित्त कुस्ती दंगल रंगली. कुस्त्यांचे थरारक सामने रंगले.
चाटगावचा हरी गोरे व जिवाचीवाडीचा बाळनाथ चौरे यांच्यातील अंतिम कुस्ती अनिर्णित ठरली. सात मिनिटे चाललेल्या लढतीत या बाळनाथने दोन वेळा डाव टाकला. मात्र, हरी गोरेने ते उधळून लावले. पंचांनी अखेर सामना अनिर्णित घोषित केला. दोघांनाही समसमान बक्षीस देण्यात आले. या कुस्ती फडाचे उद्घाटन माधव निर्मळ, निखिल मुंडे, सपोनि महादेव ढाकणे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, बिट्टू मुंडे, सोपान चाटे, वस्ताद रामभाऊ सोळंके यांच्या हस्ते झाले. स्व. सुलोचना बलभीमराव खाडे स्मृती पुरस्कारासाठी अंतिम लढतीसाठी चांदीची गदा व रोख आठ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. हे बक्षीस गणेश खाडे यांच्या वतीने देण्यात आले. दहा रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतची बक्षिसे ग्रामस्थांनी विजेत्या मल्लांना दिली. जिल्हा व परजिल्ह्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. बंटी लटपटे विरुद्ध किरण जाधव, सुनील बडे विरुद्ध अनिकेत शिंदे, विवेक शेंडगे विरुद्ध गोकूळ करवरकर, बाळू चामनर विरुद्ध सुरज शेख, हरी देवकते विरुद्ध अक्षय बहिरवाल या कुस्त्या विशेष आकर्षण ठरल्या. पहेलवान अंकुश बडे व महादेव मुजमुले यांनी सामन्यांचे निवेदन केले.
कांदेवाडी येथे भगवानबाबा जयंती व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मल्लांनी कुस्त्याचा फड गाजवला. यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis