लातूर जिल्ह्यात वर्षभरात विविध गुन्ह्यांत १७.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
लातूर, 03 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारी विरोधात आक्रमक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने सन २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल ४ कोटी ६३ लाख ९
लातूर जिल्हा पोलीस : स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारीविरोधात प्रभावी धडक २०२५ मध्ये विविध गुन्ह्यांत १७.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त


लातूर, 03 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारी विरोधात आक्रमक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने सन २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल ४ कोटी ६३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, तर अवैध धंद्यांवर कारवाई करत १२ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच खुनासारख्या गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांचाही यशस्वी उलगडा करण्यात यश आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली स्थानिक गुन्हे शाखा ही गुन्हेगारी विरोधातील प्रभावी व विश्वासार्ह यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या बळावर एलसीबीने गुन्हेगारीला मोठा आळा घातला आहे.

सन २०२५ मध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अमली पदार्थांची तस्करी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास करण्यात आला. संवेदनशील खुनाच्या तब्बल १० गुन्ह्यांचा उलगडा करून १३ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये वाढवणा हद्दीतील परप्रांतीय महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकण्याचा गुन्हा

तसेच औसा पोलीस ठाणे हद्दीतील स्वतः चा मृत्यू बनावट दाखवून कार जाळल्याचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. किनगाव हद्दीतील बहुचर्चित दरोडा प्रकरणातील आरोपीलाही मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

एलसीबीने ३ जबरी चोरीचे गुन्हे उघड करून १६.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल, ८१ घरफोडीचे गुन्हे उघड करून ५४.२६ लाख रुपये, १११ चोरीचे गुन्हे उघड करून ३ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक, तसेच बाहेर जिल्ह्यातील ३२ चोरीचे गुन्हे उघड करून १४.२९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एकूणच चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यांत ४.६३ कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कडक कारवाई एलसीबीने विशेष मोहिमा राबवत यामध्ये अवैध जुगाराचे ११५ गुन्हे, हातभट्टी दारूचे २८६ गुन्हे, गुटखा व तंबाखू तस्करीचे ३८ गुन्हे, अवैध वाळू उपशाचे ४६ गुन्हे, अमली पदार्थ तस्करीचे ९ गुन्हे दाखल केले. या कारवायांत १२.६३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत ७गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये एमपीडीए अंतर्गत २ धोकादायक गुन्हेगारांना स्थानबद्ध, मकोका अंतर्गत २० आरोपींवर कारवाई, तसेच अनेक आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. हद्दपारी व तडीपार कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशामागे जनतेचा विश्वास व सहकार्य महत्त्वाचे असल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे. संशयास्पद हालचाली अथवा अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande