
* 58 संघांमधील 1,000 पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत होणार सहभागी
नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. वाराणसी येथील डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियममध्ये हा उद्घाटन समारंभ होणार आहे.
4 ते 11 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी होतील. यात विविध राज्ये आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 58 संघांमधील 1,000 पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धा करतील. या स्पर्धेत भारतीय व्हॉलीबॉलमधील उच्च दर्जाची स्पर्धात्मकता, खिलाडूवृत्ती आणि प्रतिभा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
वाराणसीमध्ये 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन होणे, हे शहरातील क्रीडासंबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरील आणि ॲथलेटिक विकासाला प्रोत्साहन देण्यावरील वाढता भर दर्शवते. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी केंद्र म्हणून या शहराची ओळख अधिक दृढ करत असून, हे, महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांच्या आयोजनातील शहराच्या वाढत्या भूमिकेशी सुसंगत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी