
नवी दिल्ली, 03 जानेवारी (हिं.स.) - थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी वाहून घेतले, असे मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले या समता, न्याय आणि करुणा या मूल्यांप्रति कटिबद्ध होत्या. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता, असे मोदी यांनी नमूद केले. सावित्रीबाई फुले यांनी वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. समावेशक आणि सक्षम समाज उभारण्याच्या देशाच्या प्रयत्नांना आजही सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य प्रेरणा देतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी