
परभणी, 3 जानेवारी, (हिं.स.)। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 3) पक्ष व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
या निवडणुकीत तब्बल 13 राजकीय पक्ष व आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्यासह अपक्ष उमेदवारांनाही अधिकृत निवडणूक चिन्हे प्रदान करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध पक्षांना त्यांची पारंपरिक चिन्हे देण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाला कमळ, शिवसेनेला धनुष्यबाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ, वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर, बहुजन समाज पक्षाला हत्ती, बहुजन मुक्ती पार्टीला टेबल, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकला सिंह, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनला पतंग, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रेल्वे इंजिन, प्रहार जनशक्ती पक्षाला बैट तर आम आदमी पक्षाला झाडू हे चिन्ह देण्यात आले आहे.
याशिवाय अपक्ष उमेदवारांना एकूण 17 वेगवेगळी निवडणूक चिन्हे देण्यात आली असून, त्यामध्ये कपबशी, कोट, फुटबॉल, रोड रोलर, एअर कंडिशनर, दूरदर्शन संच, शिट्टी, छत्री, अंगठी, शिवणयंत्र, नारळ, कपाट, सफरचंद, बस, ट्रक, छताचा पंखा आणि चष्मा या चिन्हांचा समावेश आहे.
सर्व पक्षीय व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप झाल्याने आता निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार आपापल्या चिन्हांसह मतदारांच्या भेटीगाठी, सभा, प्रचारफेर्या यासाठी सज्ज झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis