
यवतमाळ, 03 जानेवारी (हिं.स.) । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघ कार्यात बालकांपासून तरुणांपर्यंत सर्वांना जोडले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांमुळे संघाच्या कार्याचा विस्तार झाला. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात 5000 सेवा प्रकल्पांचा आरंभ झाला. 1994-95 मध्ये संघाने प्रचार व संपर्क विभाग सुरू केला आणि त्यातून संघ विचारांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी यवतमाळमधील बाबासाहेब आपटे स्मारक भवनात आयोजित 'समर्पणाचा शतकोत्सव' विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक तामशेट्टीवार होते. यावेळी जिल्हा संघचालक विलास देशमुख, 'साप्ताहिक स्वदेश'चे संपादक राहुल एकबोटे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रचार विभागाच्या 'संस्कृती' साहित्य विक्री केंद्राचे उद्घाटन दीपक तामशेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यवतमाळमधील संघ कार्य आणि विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा कार्यक्रम संपन्न झाला. 'विदर्भ हुंकार'चे स्तंभलेखक विवेक कवठेकर, डॉ. सतपाल सोवळे आणि स्मिता भोईटे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्कृती संवर्धक मंडळाचे हितेश शेठ, प्रदीप खराटे आणि प्रचार केंद्राचे प्रभाकर भाकरे यांचाही गौरव करण्यात आला.
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर नगर प्रचार प्रमुख संकल्प डांगोरे यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली. यावेळी, 'विदर्भ हुंकार'च्या 'समर्पणाचा शतकोत्सव' या विशेषांकाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनाचा उद्देश संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा गौरव करणे आणि राष्ट्रहिताचे साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.
प्रा. डॉ. राहुल एकबोटे यांनी याप्रसंगी बोलताना 'विदर्भ हुंकार'च्या विशेषांकाच्या प्रकाशनास 'स्वदेश साप्ताहिक'चा सन्मान मानला. बाळ सज्जनवार यांनी कार्यक्रमाची सांगता करत सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली, त्यात यवतमाळमधील संघ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड