इतके उमेदवार बिनविरोध, ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहतोय - राज ठाकरे
- बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे जाणार कोर्टात मुंबई, 03 जानेवारी (हिं.स.) - माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्या
राज ठाकरे


- बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे जाणार कोर्टात

मुंबई, 03 जानेवारी (हिं.स.) - माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असे संतप्त विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी बिनविरोध विजयावरुन प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यात बिनविरोध पॅटर्न तयार झालाय - अविनाश जाधव

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच तब्बल ६४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे बिनविरोध नगरसेवक जाहीर करण्यात आले. मात्र, आता यावरूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकारचा बिनविरोध पॅटर्न वेळीच थांबवला नाही तर यापुढे निवडणुकाच होणार नाहीत, अशी भीतीही मनसेने व्यक्त केली आहे. या बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे सोमवारी कोर्टातही जाणार आहे. याबाबतचे सर्व पुरावे मनसे नेते अविनाश जाधव यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांनाही सुपूर्द केले आहेत. दरम्यान आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

अविनाश जाधव पुढे म्हणाले, काल दिवसभर उमेदवार विकत घेतले जात होते, अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं जात होतं. सायंकाळी आम्ही या विरोधात आंदोलन केलं. यामुळे आज सकाळी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे की, या जागा बिनविरोध कशा झाल्या? या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी अर्ज मागे घेतले आहेत, ते सर्व विकले गेले आहेत. त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक केला पाहिजे. कोणी कॉल केले, किती वेळा कॉल केले? मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजे की यांना मतदान केंद्रावर कोण घेऊन गेलं? सगळी निवडणूक पैशांनी विकत घेतली आहे. याच ठिकाणी पैशांचा मोठा व्यवहार झाला आहे. पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. सोमवारी आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत.

कोपरी भागातील मनसेच्या महिला उमेदवाराला पमनानी नावाच्या व्यक्तीने मध्यरात्री जवळपास ३० ते ४० वेळा फोन केले. त्यांना मुलुंड येथे जबरदस्ती भेटायला बोलावलं होतं. उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना पाच कोटीची ऑफरही देऊ केले. हवं तर तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, असंही अविनाश जाधव म्हणाले. राज्यात बिनविरोध पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न आता मोडला नाही तर निवडणुकीच्या सहा महिने आधी माणसं दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणुकाच होऊ देणार नाहीत. याची चौकशी झाली तर ६४ च्या ६४ ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे. निवडणुकाच होणार नसतील तर मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही”, असंही अविनाश जाधव म्हणाले.आम्ही राज ठाकरेंना पुरावे दिले“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील परिस्थिती समजून घेतली. आम्ही राज ठाकरेंना काही पुरावे दिले आहेत. भविष्यात या सर्व गोष्टी समोर येतील. अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. भाजपा आणि शिवसेना या पातळीवर उरले आहेत. आज महानगरपालिकेला झालं, उद्या आमदारकी-खासदारकीला होईल. त्यामुळे आम्ही याविरोधात सोमवारी कोर्टात जाणार आहोत. सरसकट ६४ ठिकाणी बिनविरोध निवड कशी झाली आहे हे तपासायला हवं. सगळे विकले गेलेली माणसं आहे. त्या त्या पालिकांचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त हेच निवडणूक अधिकाऱ्यांचं काम करत आहेत. ही रोज मंत्री महोदयांच्या घरी भांडी घासणारी लोक आम्हाला काय न्याय मिळवून देणार?” असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande