सेलू : दोन ट्रॅक्टरसह 9.10 लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 03 जानेवारी (हिं.स.)। सेलू शहरातील हसमुख कॉलनी परिसरात सेलू पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला. अवघ्या काही तासांच्या अंतराने करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी दोन ट्रॅक्टरसह
सेलू : दोन ट्रॅक्टरसह 9.10 लाखांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 03 जानेवारी (हिं.स.)। सेलू शहरातील हसमुख कॉलनी परिसरात सेलू पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला. अवघ्या काही तासांच्या अंतराने करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी दोन ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण 9 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या पथकांनी पहिली कारवाई हसमुख कॉलनीतील परफेक्ट सर्व्हिसेस सेंटरसमोर केली. पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दोन जण विनापरवाना लाल रंगाच्या महिंद्रा ‘सरपंच’ ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-28 डी 6976) मधून अवैध रेतीची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रंगेहात कारवाई करत ट्रॅक्टर व रेती असा सुमारे 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पुलाते करीत आहेत.

त्यानंतर अवघ्या तीन तासांत दुसरी मोठी कारवाई करण्यात आली. त्याच परिसरात सापळा रचून पोलिसांनी एकाला निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास अवैध रेती आढळून आली. या कारवाईत ट्रॅक्टर व रेती असा सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मुलगीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 48 (7) व (8) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध उत्खनन व वाळू वाहतूक करणार्‍यांची कोणतीही गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक कडकपणे सुरू राहील, असा इशारा पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, सपोउपनि भिसे यांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सेलू परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande