चूक झाली माफ करा, मात्र भाजपासोबतच राहा, बावनकुळेंनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मागितली माफी
अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.) यंदाच्या महापालिका निवडणुकीत ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही, अशांची भाजपा नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागतली आहे. ''ब्लंडर मिस्टेक झाली, खरंच चुकलं. या चुकीसाठी माफ करा. तुम्ह
चूक झाली माफ करा, मात्र भाजपासोबतच राहा चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मागितली माफी


अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.)

यंदाच्या महापालिका निवडणुकीत ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही, अशांची भाजपा नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागतली आहे. 'ब्लंडर मिस्टेक झाली, खरंच चुकलं. या चुकीसाठी माफ करा. तुम्ही आपले आहात आमचं खरंच चुकलय अशा शब्दांत बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन माफी मागितली.

खरं तर, उमेदवारी न मिळाल्यानं दुखावलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बावनकुळेंनी माफी मागितली. अमरावती शहरातील प्रसिद्ध वकील प्रशांत देशपांडे यांच्या घरी जाऊन झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय, खरंच आमचं चुकलंच अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात जोडून माफी मागितली. अमरावती महापालिका निवडणुकीत तुम्ही सारे भाजपाला मजबूत करा. सकारात्मक दृष्टी ठेवून मैदानात उतरा, अशी विनंती देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना सपशेल नाकारण्यात आलं. यामुळं पक्षाविरोधात अमरावती शहरात नकारात्मक सूर उमटतोय. अशा परिस्थित नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (2 जानेवारी) अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील आंबा पेठ प्रभागातून अ‍ॅड. प्रशांत देशपांडे हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक आश्वासनंदेखील दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. देशपांडे यांच्याप्रमाणेच अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना सध्या भाजपात आहे.

अशा स्थितीत शुक्रवारी रात्री 10 वाजता बावनकुळे प्रशांत देशपांडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी देशपांडे यांच्यासह शेकडो समर्थकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे तीव्र भावना व्यक्त केल्या.

पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप : अमरावती महापालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी निश्चितीची जबाबदारी देण्यात आली होती, अशा समितीच्या प्रमुखांनी शहरात अनेकांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. ज्या व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला अशांना भाजपाची उमेदवारी देण्यात आली. असं दुःख देखील भाजपा कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त केलं.

ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी ठरवले उमेदवार : अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार कोण असावेत? हे निवडण्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आली, त्यापैकी एकाही व्यक्तीनं कधी कोणतीही निवडणूक लढली नाही. असं असताना या मंडळींनी मनमानी कारभार करत पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून पक्षाबाहेरच्यांना उमेदवारी दिली. यासाठी मोठा आर्थिक व्यवहार देखील झाला. काही जणांकडून रोख रक्कम तर काही जणांकडून धनादेश स्वरूपात पैसे घेण्याचा उद्योग झाला, असा संतापदेखील बावनकुळे यांच्यापुढे व्यक्त करण्यात आला.शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी आणि जयंत डेहनकर यांनी मनमानी कारभार करून पक्ष कार्यकर्त्यांना दुखावलं. विशेष म्हणजे, उमेदवार निश्चित करणाऱ्या समितीमध्ये असणारे प्रा. रवींद्र खांडेकर आणि किरण पातुरकर यांना डावलून या तिघांनी मनमानी कारभार केला, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

बावनकुळेंनी देशपांडे यांना दिली स्वीकृत सदस्याची ऑफर : यावेळी बावनकुळे यांनी अ‍ॅड. देशपांडे यांच्या घरी पोहोचल्यावर सर्वात आधी तुम्हाला महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही घेणार आहोत. केवळ एका प्रभागापुरता नव्हे तर संपूर्ण शहरासाठी तुम्ही विकासात्मक दृष्ट्या विचार करावा, अशी पक्षाची इच्छा आहे, असं बावनकुळे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande