
छत्रपती संभाजीनगर, 03 जानेवारी (हिं.स.)। शहर वरचेवर समृद्ध होत असून खेडी बकाल होत आहेत, आजच्या युवकांना खेड्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. गाव-खेड्यातील कारागिरांना संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. जोपर्यंत खेडी आत्मनिर्भर होणार नाहीत तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित युवा प्रबोधन शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते. डॉ गव्हाणे यांच्या हस्ते शुक्रवारी शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर प्रशांत नागोसे, विनोद देवतळे,. अमित सरोदे व संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले, विविध भाषा, जात, धर्म व विविधता असलेलया भारताला एकसंघ करण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेले तरी गांधीजीच्या विचारांची प्रस्तुतता कायम आहे. आज ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनशैलीतील दरी रुदावत असतांना युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गांधीजींचे जीवन विचार आणि प्रत्येक कृती आदर्श आहे. त्याचा अंगीकार युवकांनी करावा, असे आवाहनही डॉ.गव्हाणे यांनी केले.
यावेळी प्रशांत नागोसे यांनी 'ग्रामस्वराज्य म्हणजे काय ?' या विषयावर आपले विचार मांडले तर 'गांधीजी आणि ग्रामस्वराज्य' या विषयावर श्री. अमित सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनी 'गाव आणि शहर' या विषयावर खुली चर्चा केली. या खुल्या चर्चेत अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. शेवटच्या सत्रात सहभागी शिबीरार्थींनी आपली मनोगते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी शिबीरा पाठीमागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन डॉ. दत्ता किटाळे यांनी केले तर संदीप चाळक यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान फदाट, योगेश राखुंडे, विकास वाघमारे, वैभव कऱ्हाळे यांनी प्रयत्न केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis