
गंगटोक, 03 जानेवारी (हिं.स.) सिक्किमच्या सोरेंग शहरात आज, शनिवारी पाहाटे 5.58 वाजता 3.9 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आणि अनेक लोक घराबाहेर पडले. ईशान्य राज्यात सकाळी-सकाळी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्विटरवर (एक्स) दिलेल्या माहितीनुसार सिक्कीमच्या सोरेंग शहरात आज, शनिवारी 5 वाजून 58 मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर खोल होते. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. दरम्यान भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरून गेले आणि आपल्या घरांबाहेर आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही.--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी