
गुवाहाटी, 3 जानेवारी, (हिं.स.)। चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे तसेच फूड ब्लॉगर म्हणून लोकप्रिय असलेले आशीष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रूपाली बरुआ हे गुवाहाटी येथे झालेल्या रस्ते अपघातात जखमी झाले. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असून फारशी गंभीर दुखापत नसल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुवाहाटीच्या जू रोड परिसरातील गुवाहाटी अॅड्रेस हॉटेलसमोर, गीता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडला. चांदमारीकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका मोटारसायकलने रस्ता ओलांडत असलेल्या आशीष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीला धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले, तर मोटारसायकलस्वारालाही गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच गीता नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी मोटारसायकलस्वाराला उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (जीएमसीएच) येथे दाखल करण्यात आले. तर अभिनेता आशीष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रूपाली बरुआ यांनाही तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य जू तिनियाली परिसरातील गुवाहाटी अॅड्रेस रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर बाहेर पडताना रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगातील ‘अॅव्हेंजर’ मोटारसायकलने त्यांना धडक दिली.
दरम्यान, या अपघातानंतर आशीष विद्यार्थी यांनी चाहत्यांसाठी एक व्हिडिओ सादर करून स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “रूपाली आणि मी रस्ता ओलांडत असताना एका बाईकने आम्हाला धडक दिली. आम्ही दोघेही ठीक आहोत. रूपालीवर डॉक्टरांची देखरेख सुरू आहे आणि सर्व काही ठीक आहे. मला केवळ किरकोळ दुखापत झाली असून मी पूर्णपणे ठणठणीत आहे.”
जखमी बाईकस्वाराला शुद्ध आली असून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. “आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. सर्वांच्या चिंता आणि शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद,” असेही त्यांनी नमूद केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, दीर्घ अभिनय कारकिर्दीसोबतच आशीष विद्यार्थी सध्या फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगर म्हणूनही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. आसाम आणि ईशान्य भारतातील प्रवास व खाद्यसंस्कृतीवर आधारित त्यांच्या यूट्यूब चॅनलला सध्या सुमारे २४ लाख सबस्क्राइबर्स आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर