
* शासन निर्णय जारी
मुंबई, 03 जानेवारी (हिं.स.) - नागपूरसह विदर्भातील ग्रामीण महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी बचत गटातील महिलांनी तयार वस्तूंची विक्री करण्यासाठी नागपूर येथे 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) उभारला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूरला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मान मिळाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जात असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे.
राज्यातील तब्बल ६० लाख कुटुंबांना यामुळे आर्थिक लाभ होईल. मध्यस्थांची साखळी संपवून विक्रीचा पूर्ण नफा थेट महिलांच्या हाती पडणार असल्याने त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. महिला बचत गटांच्या उत्पादनांना आधुनिक ओळख आणि मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र 'वन स्टॉप शॉप' ठरेल.
• २० कोटी निधीची तरतूद
प्रत्येक 'उमेद मॉल'च्या उभारणीसाठी सुमारे २० कोटी रुपयांपर्यंतच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोक्याच्या जागा या मॉलसाठी दिल्या जाणार असून असून मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील.
* सर्व वस्तू ग्रामीण महिलांनी बनविलेल्या!
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. मॉलमध्ये मिळणाऱ्या सर्व वस्तू ग्रामीण महिलांनी हाताने आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या असतील. विविध प्रकारचे पापड, लोणची, मसाले, चटण्या, कुरडया, शेवया, सेंद्रिय धान्य आणि कडधान्ये, तूप, मध इत्यादी तसेच, बांबूच्या वस्तु, सजावटीच्या वस्तु, पर्स, बॅग्ज, हाताने विणलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल, चादरी, तोरण असे सर्व याठिकाणी असेल. शिवाय नैसर्गिक साबण, अगरबत्ती, धूप, उटणे या वस्तूंचाही समावेश असणार आहे.
* उमेद मॉल'मुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना वाव
नागपूरचा उमेद मॉल' ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे महत्वाचे व्यासपीठ असणार आहे. महिलांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात, घरांत जाणे सोपे होईल. महिलांच्या हाती पैसा येईल. घर, कुटुंब व भविष्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी