
ठाणे, 3 जानेवारी, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने 15 डिसेंबर 2025 ते 01 जानेवारी 2026 या 17दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक व कठोर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली.
या कालावधीत अवैध मद्य, अंमली पदार्थ, रसायने, शस्त्रास्त्रे, प्रचार साहित्य व रोख रक्कम असा एकूण रु 2 कोटी 75 लाख 09 हजार 965 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पथकातंर्गत् नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथके, फ्लाइंग स्क्वॉड व लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मॉडेला चेक नाका, श्रीनगर, किसननगर, खारीगांव, नाशिक रोड, मुंब्रा, खिडकाळी, डायघर, शीळ रोड, विटावा, मनिषानगर, खारीगांव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहिम सुरू आहे. या मोहिमेत 9.54 लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ व शस्त्रांवर कारवाई विशेष मोहिमेत 57937.176 किलो अंमली पदार्थ (किंमत रु. 2,28,48,757.00) जप्त, 59 अवैध शस्त्रास्त्रे जप्त करुन 619 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहे. तसेच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर यांचेवर शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यवाटप रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रु. 10,26,063 किमतीचे 10,658.89 लिटर मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईत 68 गुन्हे दाखल करुन 53 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गावठी दारू — 1,146 लिटर (रु.1,14,633), देशी मद्य — 89.93 लिटर (रु 35,770), बीअर — 70.55 लिटर (रु 20,740), विदेशी मद्य/वाईन — 32.3 लिटर (रु.38,935), रसायने — 55,250 लिटर (रु 19,33,750) असा एकूण रु. 26,81,145 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम*
शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेमार्फत सार्वजनिक व खासगी मालमत्तेवरील बेकायदेशीर प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम राबविण्यात आली असल्याचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले. तसेच ही सर्व कारवाई सी.सी.टिव्हीच्या निगराणीखाली करण्यात येत असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक ठेवण्यासाठी आचारसंहिता उल्लंघनावर तात्काळ व कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर