
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। मापगाव येथे घडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणात रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवघ्या काही तासांत सात आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. अलिबाग पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली असून, या कामगिरीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळावली आहे.
मापगाव येथील कुक्कुटपालन व्यवसायाशी संबंधित पोल्ट्री खाद्य निर्माते पाथरे यांच्या घरावर शनिवारी (दि. ३) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना जबरदस्तीने एका खोलीत डांबून ठेवले. पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत फर्णे यांच्याकडे सोपविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. अलिबाग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे तपास सुरू केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भिवंडी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच दरोडा उघडकीस आणण्यात पोलिसांना मिळालेले यश हे रायगड पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके