गळा आवळून हत्या प्रकरणी आरोपी दोषी; ८ वर्षांची शिक्षा
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। क्षुल्लक भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी राहुल उदय वाघमारे यास ८ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर
गळा आवळून हत्या प्रकरणी आरोपी दोषी; ८ वर्षांची शिक्षा


रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। क्षुल्लक भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी राहुल उदय वाघमारे यास ८ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी दिला.

सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीस भा. दं. वि. कलम ३०४ (भाग २) अंतर्गत दोषी ठरविले. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

या घटनेची माहिती अशी की, दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बुरुमखाण आदिवासीवाडी, ता. अलिबाग येथे फिर्यादी अर्चना अजय वाघमारे यांचे सासरे संतोष बाळू वाघमारे आणि आरोपी राहुल वाघमारे यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन भांडणात रूपांतरित झाला. भांडण सोडविण्यासाठी अजय संतोष वाघमारे मध्ये पडले असता आरोपीने त्यांचा राग मनात धरून अजय वाघमारे यांचा दोन्ही हातांनी गळा आवळला. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून अंगावर बसत गळा दाबला तसेच छाती व पोटावर गुडघे मारले. या मारहाणीत अजय वाघमारे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी अर्चना वाघमारे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अलिबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भारत फार्णे, सचिन कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास जलदगतीने पूर्ण केला.

खटल्यात शासकीय अभियोक्ता संतोष पवार यांनी एकूण १२ साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच पैरवी अधिकारी सुनील डोंगे, पैरवी कर्मचारी सचिन खैरनार, पोलीस हवालदार प्रविण पाटील यांच्या सहकार्याची न्यायालयाने दखल घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande