अमरावती - अवैध गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त; साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट
अमरावती, 6 जानेवारी (हिं.स.) आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात वि
Illegal village liquor den demolished, goods worth five and a half lakhs destroyed


अमरावती, 6 जानेवारी (हिं.स.) आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात दारू व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले आहे.

दि. ६ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीतील ग्राम शेंदोळा (बु.) येथील पारधी बेड्यावर छापा टाकला. यावेळी दात्या जयप्रकाश भोसले (वय ४०), किरण धरम भोसले व तारामती झगडया भोसले (सर्व रा. शेंदोळा बु.) हे अवैधरित्या गावठी हातभट्टीवर दारू तयार करताना रंगेहात मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ७५० लिटर मोह माश सळवा, ३५० लिटर गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच पोलीस स्टेशन गाडगे नगर हद्दीतील वलगाव रोडवरील ऑर्किड शाळेच्या मागील नाल्याजवळ छापेमारी करताना राज रामनाथ वाघमारे (वय २५, रा. नवसारी, सिद्धार्थ नगर, अमरावती) हा अवैधरित्या दारू निर्मिती करताना आढळून आला. त्याच्याकडून १२०० लिटर सळवा, २०० लिटर गावठी दारू व साहित्य असा ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ), (ड) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे व रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande