
अमरावती, 23 फेब्रुवारी (हिं.स.)बिहार, सिक्कीम व केरळचे माजी राज्यपाल तथा रिपाइंचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वाेच्च पदवी मिळविली आहे. अमरावती विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षान्त समारंभात डॉ. कमलताई गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेतंर्गत राज्यशास्त्र विषयात वाङ्मय पंडित (डी.लिट) या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. माजी भारतीय सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते ही पदवी त्यांना सन्मानित केली गेली. डॉ. कमलताई गवई या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांची मातोश्री आहेत. अमरावती नजीकच्या मोगरा येथे डॉ. कमलताई गवई यांच्या अथक परिश्रमातून विपश्यना केंद्र साकारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विशेष विपश्यना शिबिर, ध्यानसाधना निरंतरपणे सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी