
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत खरसई समुद्रकिनारी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान उत्साहात पार पडले. सुमारे १२५ हून अधिक निरंकारी सेवादारांनी किनारपट्टीवरील सुमारे तीन किलोमीटर परिसराची स्वच्छता करून जलसंवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमाला बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीची प्रेरणा लाभली असून, “भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी,” असे प्रतिपादन सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी केले आहे. त्याच विचारांची प्रचीती या अभियानातून आली. कार्यक्रमास श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल चौगुले, उपनगराध्यक्ष अनंत गुरव, प्रशासकीय अधिकारी राहुल भुगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत निरंकारी सेवादारांचे अभिनंदन केले.
देशभरात या अभियानाचा चौथा टप्पा २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी राबविण्यात आला. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून जलसंरक्षण, पर्यावरण संतुलन आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश देणारा ठरला आहे. झोन ४०अ खरसई अंतर्गत झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीवर्धन ब्रँचचे मुखी मुकुंद श्रीवर्धनकर यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले. प्रशासनाने या कार्याबद्दल आभार व्यक्त करत भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके