
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कोकण विभागात आज अभूतपूर्व इतिहास रचला गेला. विभागातील सुमारे २० हजार शाळांमधील तब्बल ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले “हिंद-दी-चादर” हे गीत सादर करत “बोले सो निहाल”चा जयघोष केला. या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद Best of India Records मध्ये विश्वविक्रम म्हणून करण्यात आली.
नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमी येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर सुजाता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुरु तेग बहादूर यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर, सेक्टर २९ येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या भव्य समागमात १५ ते २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, धैर्य, करुणा आणि समतेचा संदेश देणारे हे सामूहिक गायन सामाजिक ऐक्य अधिक बळकट करणारे आहे. आयुक्त कैलास शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
सकाळी नेमके ९ वाजता विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायन सादर केले. महाराष्ट्र शासनाची ही मोहीम केवळ व्हिडिओ उपक्रम न राहता संस्कारांची डिजिटल चळवळ ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके