
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.) । रायगड पोलीस ठाणे नेरळ हद्दीत धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी मौजे ममदापूर, ता. कर्जत, जि. रायगड येथे घडल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित फिर्याद २२ फेब्रुवारी रोजी रात्री दाखल करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर येथील स्थानिक गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. संबंधित मुलाखत एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी घेतली होती. या वक्तव्यांमुळे काही नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर तरतुदीनुसार ३२/२६ असा गुन्हा दाखल केला असून राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, कोणत्याही समाज, धर्म किंवा घटकांविषयी सार्वजनिकरीत्या बोलताना संयम, परस्पर आदर आणि सामाजिक जबाबदारी जपणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विविधतेत एकता ही समाजाची ताकद असून मतभेद असले तरी संवाद आणि कायदेशीर मार्गाने तोडगा काढणे हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके