अंत्री (मलकापूर) येथे राष्ट्रसंत गाडगे बाबांची जयंती उत्साहात
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : बाळापूर तालुक्यातील अंत्री (मलकापूर) गावात गेल्या चाळीस वर्षांपासून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन या त्यांच्या शिकवणी
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : बाळापूर तालुक्यातील अंत्री (मलकापूर) गावात गेल्या चाळीस वर्षांपासून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन या त्यांच्या शिकवणीचा वारसा जपण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न रामभरोसे मित्र मंडळाकडून केला जात आहे.

जयंतीनिमित्त सकाळी प्रभातफेरी काढून गावातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनातून त्यांच्या विचारांचा प्रसार करत ग्रामस्थांना स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. “स्वच्छ गाव – सुंदर गाव” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत समाजातील भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, गावात परीट समाजबांधवांची संख्या नगण्य असतानाही सामाजिक जाणिवेतून ग्रामस्थ मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतात, ही उल्लेखनीय बाब आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उरळ येथील आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष ‘शेतकरी पुत्र’ गोपाल भाऊ पोहरे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीकृष्णजी साबळे, प्रभाकरजी देशमुख (साधुबुवा), सुधीरभाऊ वाघोळे, वसंत देशमुख, बबलू बुवा सुरे, अमृतजी इंगळे, रूपेश इंगळे, प्रकाश टाले, गजाननबापू देशमुख, वकील इंगळे, गजानन बोराखडे (दैनिक विदर्भ मतदार प्रतिनिधी) यांच्यासह गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

गेल्या चार दशकांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करत असून गाडगे बाबांच्या विचारांचा दीप पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य रामभरोसे मित्र मंडळ प्रभावीपणे पार पाडत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande