
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) । सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (जीडीसी अॅन्ड ए.) तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षा मे २०२६ संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या तसेच विविध प्रकारच्या सहकारी संस्थांमधील पदभरतीसाठी प्राधान्य दिले जाते. याशिवाय सहकारी संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा नियमांनुसार परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वेतनवाढही मंजूर केली जाते.
तसेच, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या लेखापरीक्षकांच्या नामतालिकेत समावेश होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
ही परीक्षा दि. २६, २७ व २८ मे २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
जीडीसी ऍन्ड ए. व सीएचएम परीक्षा २०२६ साठी [https://gdca.maharashtra.gov.in](https://gdca.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि. १० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे