अकोला : आमदार पठाण यांना खंडणीची धमकी
‘वाय’ श्रेणी सुरक्षेची मागणी अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान मन्नान पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉलवरून १० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Photo


‘वाय’ श्रेणी सुरक्षेची मागणी

अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान मन्नान पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉलवरून १० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ ‘वाय’ श्रेणी सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

आमदार पठाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजता आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगत शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. रक्कम न दिल्यास “Baba Siddique यांना जसे मारले तसे तुला व तुझ्या परिवारालाही मारू” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. त्यानंतर तीन-चार वेळा पुन्हा फोन आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या घटनेनंतर आमदारांनी तात्काळ अकोला पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून १८ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता त्यांनी केंद्राचे गृहमंत्री अमित शाह यांनाही निवेदनाची प्रत पाठविली आहे.

दरम्यान, २३ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्यांना उपस्थित राहावे लागणार असून, मतदारसंघातील तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांमुळे सातत्याने दौरे करावे लागतात. त्यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी व ‘वाय’ श्रेणी सुरक्षा त्वरित प्रदान करावी, अशी मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande