मूर्तिजापूर बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक!
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यातील मुर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुर्तिजापूर येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यातील मुर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुर्तिजापूर येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अ वर्ग खरेदीदाराचा परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्या सालासार ट्रेडर्सशी संबंधित अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल व सुनील अग्रवाल यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधितांनी मागील तीन महिन्यांत अडत्यांमार्फत सुमारे 8428.66 क्विंटल सोयाबीन खरेदी केली. खरेदी वेळी त्यांनी 20 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करू असे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटल्यानंतर रक्कम न भरता संबंधितांचे मोबाईल बंद आढळले तसेच निवासस्थानही रिकामे असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात शेतकरी, अडते, बाजार समिती व शासन यांची मिळून सुमारे 1.75 कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचा आरोप आहे. तसेच बाजार समितीची सुमारे 9.19 लाख रुपयांची बाजार फी व देखरेख शुल्क न भरल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande