
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी (हिं.स.) । पक्षिनिरीक्षण मोहिमेनंतर वन विभाग आयोजित दोन दिवसांच्या पक्षिमित्र संमेलनाची सांगता क्षेत्रीय भेटी व पक्षिनिरीक्षणाद्वारे झाली. सकाळी सातसाडेसात पोमेंडी येथील देवराईत पक्षिमित्र, पक्षिनिरीक्षक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे, तसेच पक्षिमित्र विराज आठल्ये, निकिता शिंदे यांसह राज्यभरातून आलेले सहभागी एकत्र आले.
सकाळी पोहोचल्यावर पक्ष्यांच्या सुरेल आवाजाने सर्वांचे स्वागत झाले. काजरा वृक्षाविषयी माहिती श्री. मोरे यांनी दिली. मलबार पाइड हॉर्नबिलने झलक दाखवून पक्षिनिरीक्षणाची दमदार सुरुवात केली. एशियन ब्लॅक ड्रोंगो (कोतवाल) झाडावर अस्तित्व दाखवत, ब्लॅक हेडेड बार्बेट (तपकिरी डोक्याचा तांबट) आपल्या जोडीदारासोबत ‘कुटुर, कुटुर’ साद देत दिसला. इंडियन आयोरा (सुभग शीळ), फूलटोच्या, सूर्यपक्षी, एशियन कोयल (मादी कोकीळ) यांनी आपली उपस्थिती स्पष्ट केली.
काळ टोपी हळद्याचा सूर आणि त्याची जोडीदारीण परिसरात घुमताना दिसली. पुलाखालच्या झाडावर जंगल वुडआऊल (वनघुबड) आणि नंतर ब्लू इअर्ड किंगफिशर (नीलकर्ण खंड्या) पाण्यात डुबकी मारताना टिपले गेले. जंगल बदामाच्या झाडावर लालसर फळ फुटलेले, फ्लॉवर पेकर (फूलटोच्या) आणि ब्लॅक नेपेड मोनार्च (जांभळी लिटकुरी) देखील दिसून आले.परतीच्या मार्गावर दयाळा, बुलबुल, सुभगची शीळ आणि सूर्यपक्ष्यांचे चुकचुकणे सतत ऐकू येत होते. या पक्षिदर्शनाने राज्यभरातून आलेले पक्षिमित्र व पक्षिनिरीक्षक मनापासून आनंदित झाले आणि संमेलनाचे उद्दीष्ट – पक्ष्यांचे संरक्षण व निरीक्षणाबाबत जनजागृती – यशस्वी ठरले.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी