‘हिंद-दी-चादर’चा जयघोष: जनता विद्यालय खोपोलीत ऐतिहासिक उपक्रम
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील खोपोली येथील जनता विद्यालय खोपोली येथे विद्यार्थ्यांच्या स्वरात ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष घुमला. हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे गुरु तेग बहादूर यां
‘हिंद-दी-चादर’चा जयघोष: जनता विद्यालय खोपोलीत ऐतिहासिक उपक्रम


रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील खोपोली येथील जनता विद्यालय खोपोली येथे विद्यार्थ्यांच्या स्वरात ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष घुमला. हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल Best of India Records यांनी घेतली असून, यामुळे विद्यालयासह संपूर्ण खालापूर तालुक्याचा गौरव वाढला आहे. यावेळी अप्पर आयुक्त वैशाली इंदानी यांनी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, सेक्टर २९ येथे आयोजित भव्य समागमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या सोहळ्यास देश-विदेशातून सुमारे १५ ते २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी दीपा परब, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथ गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अप्पर आयुक्त वैशाली इंदानी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. धैर्य, करुणा, समता आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी एकसुरात सादर केलेले हे गीत सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारे ठरले असून, जागतिक स्तरावर त्याची नोंद होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ही मोहीम आता केवळ ‘व्हिडिओ कंटेंट’ न राहता एक संस्कारक्षम डिजिटल चळवळ बनली आहे. गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून, संस्कारक्षम शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande