
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात सध्या कलिंगडचा हंगाम रंगात आला असला तरी अवकाळी पावसामुळे उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांची घट झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, माणगाव या तालुक्यांसह विविध भागांत रस्त्याच्या कडेला आणि बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र बाजारात आलेल्या मालाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा निम्म्यावर आल्याचे चित्र आहे.
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगड लागवड केली जाते. कमी कालावधीत तयार होणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले पीक म्हणून शेतकरी कलिंगडकडे वळतात. डिसेंबर महिन्यातच कलिंगड बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवड लांबणीवर गेली. परिणामी पीक उशिरा तयार झाले आणि उत्पादनात मोठी घट झाली.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात कलिंगड दाखल झाले आहे. अलिबाग-रोहा, पेण-अलिबाग, रोहा-महाड तसेच रेवदंडा-मुरुड मार्गांवर ठिकठिकाणी विक्रीची दुकाने उभी राहिली आहेत. लहान आकाराच्या कलिंगडापासून मोठ्या आकाराच्या कलिंगडापर्यंत विविध प्रकार विक्रीसाठी ठेवले असून त्यांची किंमत ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे.
उत्पादन कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दर टिकून आहेत. सकाळी गारवा असला तरी दुपारच्या उन्हामुळे ग्राहक कलिंगडकडे आकर्षित होत आहेत. पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. मात्र निम्मेच उत्पादन हाती आल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके