शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
कोल्हापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) । शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. “महामार्ग रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला. या
शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी कोल्हापूरात आंदोलन


कोल्हापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) । शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. “महामार्ग रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनाची हाक सतेज पाटील यांनी दिली होती.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या पाटील यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाईन झूम बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार कोल्हापुरात झालेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची ठाम मागणी केली. “केवळ रेखांकन बदलून चालणार नाही. हा महामार्ग जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, गिरीश फोंडे यांनी परभणी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या कथित अत्याचारप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कोणतीही ठोस मागणी नसताना हा महामार्ग राबवला जात असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande