
नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)नाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचे नाव अंतिम ठरले आहे. पक्षाच्या वतीने नऊ सदस्यांची नावे मुंबईत प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. यातून एक नाव आज दुपारी पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे. भाजपाच्या वतीने उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले व नंतर माघार घेण्यास भाग पाडल्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांना पक्षाच्या वतीने स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मनपात भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे एकूण ९ सदस्य असल्याने सभापतीपद भाजपकडेच असणार आहे. आता सभापतीपदाची निवडणूक बुधवारी (दि.२५) होणार आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. विरोधकांनी पुरेशा संख्याबळा अभावी उमेदवारी दाखल न केल्यास सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अर्थात, भाजपच्या उमेदवारीसाठी सुरू असलेली जोरदार व्युहरचना आज दुपारी मच्छिंद्र सानप यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने थंडावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV