नाशिक-समर्थ सेवा मार्गाच्या दुर्गसंवर्धन अभियानाला मोठा प्रतिसाद
Fortification of Samarth Seva Marg
नाशिक-समर्थ सेवा मार्गाच्या दुर्गसंवर्धन अभियानाला मोठा प्रतिसाद


नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या अंतर्गत सक्रिय व कार्यरत असलेल्या पर्यावरण व प्रकृती विभागाअंतर्गत आज रविवारी व्यापक दुर्ग संवर्धन अभियान हाती घेण्यात आले.या अभियानास सेवेकऱ्यांकडून मोठा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. राज्यभरातील तीनशेहून अधिक गडकिल्ल्यांवर स्वच्छतेसह विविध उपक्रम हाती घेण्यात आले.

रायगडावर आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व शिरकाई मातेस वंदन करून करण्यात आला. स्वच्छतेसह दुर्गासप्तशती ग्रंथाचे पारायण सुद्धा सर्वत्र करण्यात आले. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गडावरील देवतांचा सन्मान सेवेकऱ्यांनी केला.

महान योद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू, तुळापूर येथे सुद्धा आबासाहेब मोरे यांनी विनम्र अभिवादन केले आणि संगमेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करून भीमा, भामा, इंद्रायणी त्रिवेणी संगमावर स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

उपलब्ध जागेवर बीजारोपण करून भविष्यात या वृक्षवल्लीचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील केंद्रावर सोपविण्यात आली. यानिमित्त सेवेकऱ्यांना संदेश देतांना आबासाहेब मोरे म्हणाले, नव्या पिढीपर्यंत आपला संघर्षाचा परंतु तेवढाच गौरवशाली, अभिमानास्पद इतिहास पोहोचावा हा एक हेतू या अभियान मागे आहेच.

साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. जुलमी सत्ता उलथावून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते गड,कोट, किल्ल्यांनी. साडेतीनशे पेक्षा जादा किल्ले हिंदवी स्वराज्यासाठी आभूषणे ठरली परंतु आज या किल्ल्यांची जी अवस्था आहे ती पाहता कुणाही संवेदनशील माणसाचे मन अस्वस्थ आणि घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. या घायाळ अवस्थेतून या शक्तीस्थळांची सुटका करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आज मोठे अवघड दिसते आहे परंतु आहे ती संपत्ती सांभाळून ठेवणे आपल्या हाती आहे. याचसाठी समर्थ सेवा मार्गाने दुर्ग अभियानाच्या मार्गातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक जिल्यात रामशेज, अंकाई, रतनगड, साल्हेर, मुल्हेर, भिलाई, कऱ्हेगड, अजमेर, रावळा, जवळा, धोडपसह 35 गड, किल्ल्यावर ही मोहीम राबविण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande