
डॉ. हर्षला वेदक यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ सन्मान
कोल्हापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.): आरोग्य विभागांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळस्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व महाआरोग्य कार्यक्रमात गौरव करण्यात आला. राज्यातील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांना सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्याला हे यश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
या यशामध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी, जिल्हा क्षयरोग केंद्र व एन.टी.ई.पी. अधिकारी-कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ‘निक्षय मित्र’ (डोनर), खासगी संस्था, एन.एम.पी. व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग राहिला.
दरवर्षी राज्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासनामार्फत गौरव करण्यात येतो. यावर्षीचा सन्मान सोहळा २२ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
कार्यक्रमाला मुंबईचे नूतन उपमहापौर संजय घाडी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar