
मुंबई, 23 फेब्रुवारी (हिं.स.) — देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) कर्ज तुटवड्याला संरचनात्मक पातळीवर उत्तर देण्यासाठी UGRO कॅपिटलने ‘India by MSME’ या संस्थात्मक उपक्रमाची सुरुवात केली. या व्यासपीठावर धोरणकर्ते, नियामक, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, भांडवली बाजार संस्था आणि फिनटेक कंपन्यांना एकत्र आणण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. त्यांनी MSME साठी परवडणारी आणि संरचित कर्जसुविधा रोजगारनिर्मिती व उद्योजकतेच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
या प्रसंगी MSME संपर्क अहवालाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. अहवालानुसार, सर्वेक्षणातील 86 टक्के MSME ची वार्षिक उलाढाल ₹20 कोटींपेक्षा कमी आहे. सुरक्षित आणि दीर्घकालीन कर्जांकडे उद्योगांचा वाढता कल दिसून येत असून, UPI चा स्वीकार वाढत आहे आणि रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होत आहे. हे औपचारिक कर्जप्रवाहाकडे होत असलेल्या संक्रमणाचे द्योतक मानले जात आहे.
UGRO कॅपिटलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र नाथ म्हणाले, “MSME क्षेत्र भारताच्या GDP मध्ये सुमारे 31 टक्के योगदान देते आणि रोजगारनिर्मितीमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते. तरीही संरचनात्मक कर्ज तुटवडा मोठा आहे. ‘India by MSME’ हे धोरणकर्ते, नियामक, बँका, NBFC आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्स यांना एकत्र आणणारे सातत्यपूर्ण व्यासपीठ आहे, जेणेकरून कर्जप्रवाह जबाबदारीने आणि संरचनात्मक पद्धतीने उद्योजकांपर्यंत पोहोचेल.”
देशभरातील 300 हून अधिक शाखांमधून कंपनी 1.85 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देत असून, सुमारे ₹15,500 कोटींची मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे. ‘India by MSME’ उपक्रमाद्वारे सह-कर्ज मॉडेल, डिजिटल अंडररायटिंग आणि डेटा-आधारित कर्जनिर्णय मजबूत करून MSME क्षेत्रासाठी शाश्वत आणि जबाबदार कर्जप्रवाह निर्माण करण्याचा उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी