
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक व निर्याताभिमुख करण्याच्या उद्देशाने “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६” अंतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे २५० पेक्षा अधिक उद्योजक तसेच विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाले. उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजू शिरसाठ यांनी प्रास्ताविक करत निर्यातवृद्धीसाठी उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यशाळेत Directorate General of Foreign Trade (DGFT), APEDA, IDBI Bank, ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ (EoDB), भारतीय डाक, EY, New India Assurance तसेच ‘मैत्री’ या विभागांचे सादरीकरण करण्यात आले. निर्यात प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, वित्तपुरवठा, विमा संरक्षण, बाजारपेठ विस्तार आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी उद्योजकांनी नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बांबू औद्योगिक समूहामुळे स्थानिक उद्योजकांना मोठा फायदा होईल व बांबू क्षेत्रातील निर्यातीस चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
एम.एम. पालकर, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड यांनी जिल्हाधिकारी यांच्या सक्रिय सहभागामुळे जिल्ह्यात उद्योगविकासाला प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.ही कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील उद्योजकांसाठी निर्यात क्षेत्रातील नव्या दालनांची दारे उघडणारी ठरली असून, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमासही यामुळे नवी गती मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके