
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत दारूच्या नशेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मोटारसायकल व मोबाईल फोन लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२/०२/२०२६ रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे विसर्जन घाट, इंदिरानगर, खालची खोपोली (ता. खालापूर) येथे फिर्यादी व त्यांचा मित्र हळदी कार्यक्रम आटोपून मोटारसायकल क्रमांक एमएच ०६ सीजे १९८४ ने घरी जात होते. मात्र फिर्यादीला दारूची नशा झाल्याने त्यांचा रस्ता चुकला. त्यामुळे त्यांनी तेथेच मोटारसायकल उभी करून विश्रांती घेतली.
दारूच्या नशेत दोघेही झोपी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल तसेच मोबाईल फोन चोरून नेला. झोपेतून जागे झाल्यानंतर वाहन व मोबाईल गायब झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते करीत आहेत.
दरम्यान, दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करून झोपणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे ताजे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
______________
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके