
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांनी सन्मान केला.
भारतीय विद्यापीठ संघ (नवी दिल्ली) आणि मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. विजय रहाटे यांना श्री. ठाकूर यांनी कला क्षेत्रातील कर्तबगारीसाठी सन्मानित केले. श्री. रहाटे यांनी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ललितप्रकारांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण व उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांनिमित्त सादर केलेल्या उत्कृष्ट रांगोळी कलेसाठी हा सन्मान या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आला.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी अजिंक्य नाईक (अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन), तर अध्यक्षस्थानी प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते. सन्माननीय अतिथींमध्ये प्राचार्य (डॉ.) अजय भामरे (प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) गोविंद मुथुकुमार (महासचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन), डॉ. राजेश सोबती(निरीक्षक भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली), डॉ. मनोज रेड्डी (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, मुंबई विद्यापीठ) व डॉ. प्रसाद कारंडे (कुलसचिव, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते.हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीतील क्रीडा संकुलात पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी