चेन्नईच्या समुद्रात जळगावचा तरुण बेपत्ता
जळगाव, 23 फेब्रुवारी (हिं.स.) तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली असून त्यात जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाळधी येथील तरुणाचा समावेश आहे. जय नरेंद्र पाटील (२१) असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुटी असल
चेन्नईच्या समुद्रात जळगावचा तरुण बेपत्ता


जळगाव, 23 फेब्रुवारी (हिं.स.) तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली असून त्यात जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाळधी येथील तरुणाचा समावेश आहे. जय नरेंद्र पाटील (२१) असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुटी असल्याने कंपनीतील काही तरुण समुद्रकिनारी फिरायला गेले होते. त्यावेळी समुद्रात अचानक लाटा उसळून त्यात तीन जण पाण्यात ओढले गेले. त्यात जय पाटील याचाही समावेश आहे. तर या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. मयूरी चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. राज केदारी असं त्याच नाव असून तो पुण्यातील रहिवाशी आहेत. मात्र अद्याप जय पाटील हा अद्याप बेपत्ता आहे. त्यामुळे परिवाराची चिंता वाढली आहे.जय हा अभियांत्रिकी पदवीधर असून तो पाळधी (ता. जामनेर) येथील नरेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. तिघे जण पंधरा दिवसांपूर्वी चेन्नईतील नामवंत माहिती-तंत्रज्ञान कंपनीत रूजू झाले होते. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना कंपनीत पूर्णवेळ नोकरी देण्यात येणार होती.जयने पाळधी येथे घरी फोन करून सुटी असल्याने मित्रांसोबत फिरायला जात असल्याचे कळविले होते, मात्र काही वेळानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्याचे काही नातेवाईक चेन्नईत पोहोचले आहेत. जयच्या बहिणीचे बारावीचे पेपर सुरू आहेत. त्यामुळे परिवारातील लोक अधिकच काळजीत आहेत. त्याचे वडील शेतकरी, तर आई शिक्षिका आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधत मदत व बचावकार्याची माहिती घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande