
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांमधील शिवसेनेचे गटनेते आणि पक्षप्रतोद जाहीर करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जयेश मंगल कार्यालयात झालेल्या विशेष समारंभात ही निवड जाहीर केली.
शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यावेळी जाहीर झालेली पदे अशी - जि. प. गटनेते विलास चाळके, प्रतोद महेश ऊर्फ बाबू म्हाप.
पंचायत समिती खेड - सुनील मोरे, दापोली- नीलेश शेठ, मंडणगड-अनिल रहाटे गटनेते, दीपक मालुसरे प्रतोद, लांजा- उमेश पत्की, राजापूर- उमेश पराडकर व प्रसाद मोहरकर, संगमेश्वर- सुहास मायंगडे व सुरेश माईण, गुहागर- गौरव वेल्हाळ व प्रणव पोळेकर, चिपळूण- विनोद झगडे व बापू आयरे, रत्नागिरी- सौ. अर्चना साळवी व तारक मयेकर.
यावेळी सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. हा शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा मोठा विजय आहे. आता विजयी झाल्यावर या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, नाहीतर गय केली जाणार नाही. अनेक बंडखोरांशी आपल्याच लोकांनी मैत्री जपली, त्याचा फटका सर्वाधिक संगमेश्वरमध्ये बसला आहे. यापुढे पक्षाशी दगाफटका करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
यापुढे पक्षाला केंद्रस्थानी ठेवूनच काम केले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य विजयी झाले आहेत. राज्यात शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राइक रेट ९४ रत्नागिरीचा आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी भविष्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सोबतच्या खुर्चीत बसवावे. मी, भैय्या आणि योगेशदादा यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात आणला. मात्र काही पदाधिकारी हा निधी आपणच आणला, असे मतदारांसमोर सांगत असल्याचेही प्रचारादरम्यान ग्रामस्थांसोबतच्या भेटीत दिसून आले. आपण जे लोकप्रतिनिधी झालो आहोत, ते शिवसेनेमुळे निवडून आलो आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. यापुढे संघटना म्हणून निर्णय घेतले जातील.
यापुढे गटनेत्याबरोबरच मुख्य पक्षप्रतोदही नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकाकडेच जबाबदारी राहणार नाही, दोघांनी मिळून पक्षाशी बांधिल राहत कामकाज चालवायचे आहे. दोघांची भूमिका ही पक्षाची भूमिका असणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. सर्व पदे सव्वा वर्षासाठी असतील. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे असेच हास्य मतदारांच्याही चेहऱ्यावर दिसले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी