रायगड : पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय ‘अ+’ श्रेणीत
रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने राज्यस्तरीय शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेत ‘अ+’ श्रेणी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या का
State-level excellence in quality; PNP Junior College in 'A+' category


रायगड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने राज्यस्तरीय शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेत ‘अ+’ श्रेणी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे अलिबागच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन (SQAAF) प्रक्रिया राबविण्यात आली होती. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शाळांचे २०२५-२६ या वर्षात बाह्य मूल्यांकन करण्यात आले.

स्वयंमूल्यांकनात उच्च गुण मिळवणाऱ्या १०,७२१ शाळांची बाह्य पडताळणीसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०,६४४ शाळांचे प्रत्यक्ष मूल्यांकन पूर्ण झाले. अत्यंत काटेकोर निकषांनुसार झालेल्या या प्रक्रियेत राज्यातील केवळ ४२९ शाळांना ‘अ+’ श्रेणी बहाल करण्यात आली. या निवडक शाळांमध्ये पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाने स्थान मिळवले आहे.

उत्कृष्ट भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, परिणामकारक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे महाविद्यालयाला हे मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनाने प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande