
नंदुरबार, 23 फेब्रुवारी (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रुग्णांच्या तपासण्या, औषधोपचार व सेवा सुविधा मोफत दिल्या जातात. २०२५ या वर्षासाठी प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी ३४०० क्षयरोग रुग्ण हे प्रमाण धरुन नंदुरबार मधील ७२७८० संशयित रुग्ण तपासण्याचे व त्यापैकी सरकारी क्षेत्रातून १८५० व खासगी क्षेत्रातून ११०० अशा एकूण २९५० रुग्णांचे निदान करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. विविध कार्यक्रम व प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करुन ७३९१५ संशयित रुग्णांची तपासणी केली व सरकारी क्षेत्रातून १८२९ व खासगी क्षेत्रातून १०८६ अशा एकूण २९१९ रुग्णांचे क्षयरोगाचे निदान केले.
तसेच लवकर निदान व वेळीच उपचार दिल्यामुळे वर्ष 2023 मध्ये 6.30 टक्के असलेले क्षयरोगामूळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण वर्ष 2025 मध्ये 2.24 टक्के पर्यंत खाली आणण्यात यश आलेले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता २९९२ रुग्णांपैकी २२७८ रुग्ण बरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुल्यमापन संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात नवीन क्षयरूग्ण शोधणे (केस नोटिफीकेशन), क्षयरूग्णांची एच. आय. व्ही. आणि डायबिटीज तपासणी, क्षयरूग्णांसाठी च्या विविध तपासण्या करणे, क्षयरूग्णांसाठी पोषण आहार भत्ता अदा करणे इत्यादी राज्य सरकारने ठरवलेल्या मापदंडानुसार केले जाते आणि प्राप्त गुणांची सरासरी काढून मानांकन दिले जाते. त्यात नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभागाने शासनाने वर्ष 2025 साठी ठरवून दिलेल्या सर्वच उद्दिष्टांमध्ये सरासरी ९६ ते १०० टक्के काम पूर्ण केल्यामुळे सर्व ८० जिल्ह्यांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. याबाबत जिल्हा क्षयरोग केंद्र पथक प्रमुख डॉ. महेंद्र चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी व त्यांच्या चमूचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
७ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यात एकूण ८८१८५ संशयितांची क्षयरोग तपासणी केली असून त्यात ३५०४० संशयितांची एक्सरे तपासणी देखील करण्यात आली. यासाठी राज्यस्तरावरून डॉ. राजरत्न वाघमारे, सहसंचालक (कुष्ठ व क्षय) पुणे, डॉ राधाकिशन पवार, उपसंचालक (कुष्ठ व क्षय) पुणे, मा डॉ कपिल आहेर, उपसंचालक, नाशिक तसेच जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. मोनाली कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर