
लातूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
'शिक्षणाची पंढरी' हादरली! अहमदपूर येथील 'क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल'मध्ये ३०-३२ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा 'शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळखला जातो. मात्र, याच पंढरीला आणि पवित्र अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना 'क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल' थोरलेवाडी येथे घडली आहे. हॉस्टेलमधील तब्बल ३० ते ३२ चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. आरोपी उज्वल प्रकाश सोनी (रा. बैतुल, मध्य प्रदेश) याला आपल्या मोटारसायकलचे नुकसान हॉस्टेलमधील मुलांनीच केले असल्याचा संशय होता. या शुल्लक कारणावरून त्याने संयम गमावला आणि ३० ते ३२ विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करत वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केली.
विशेष म्हणजे, मारहाण करताना त्याने मी या शाळेचा प्राचार्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेतो, अशी धमकीही विद्यार्थ्यांना दिली. ज्या शिक्षकी पेशाकडे समाज मार्गदर्शक म्हणून बघतो, त्याच पदाची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे क्रूर कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी शाळेचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर (वय ४२) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी उज्वल सोनी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS २०२३: कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३).बालन्याय अधिनियम २०१५: सह कलम ७५. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे
अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी उपचार घेतल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, 'शिक्षणाच्या पंढरी'त घडलेल्या या घटनेमुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis