
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : तंजावरमधील इतिहास हा केवळ भोसले घराण्याचा नसून केवळ स्थापत्य, मंदिर, कला यांच्याशीच निगडीत नसून, तो प्रत्येक मराठी माणसाचा आहे, असे प्रतिपादन श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांनी केले.
येथील ॲड. विलास पाटणे लिखित सरफोजीराजे भोसले तंजावर या पुस्तकाचे प्रकाशन काल (दि. २२ फेब्रुवारी) सायंकाळी हॉटेल विवेक येथे दिमाखात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ॲड. विलास पाटणे यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पानिपतकार विश्वास पाटील, प्रकाश पराग पिंपळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, डॉ. कल्पना मेहता उपस्थित होत्या.
श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांनी आपल्या आईसाहेबांचे आजोळ कोकण असल्याचा उल्लेख करत इथे येऊन अभिमान वाटल्याचे सांगितले. सरफोजीराजे यांनी तंजावरमध्ये ३४ वर्षे राज्य केले. राजांच्या आयुष्याचा अभ्यासपूर्ण वेध घेत तंजावरच्या सुवर्णकाळावर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक दक्षिणेतील विस्तारित मराठा वंशाशी महाराष्ट्राला जोडण्याचे काम पूल म्हणून काम करील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तंजावर हे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, टिपू सुलतान, निजाम यांच्यामुळे चारही बाजूंनी खिंडीत सापडल्यासारखे होते; मात्र यातूनही हे मराठी वैभव टिकवणे म्हणजे केवळ दैवी कृपा आहे. आपल्या राजांनी काय केले आहे, हे पाहण्यासाठी, तेथील वैभव अनुभवण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे आजही आपली संस्कृती तंजावरमध्ये कशा प्रकारे जिवंत आहे हे पाहण्यासाठी तंजावरला नक्की भेट द्या, असे श्रीमंत बाबाजीराजे यांनी आवर्जून सांगितले.
या पुस्तकातही तंजावर येथे मुक्कामी राहून सरफोजीराजे यांच्याबद्दल अनेक संदर्भ गोळा करून ते नेमकेपणाने मांडण्याचे काम ॲड. पाटणे यांनी केले असून, त्यांच्या या कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला. आपल्या भावी पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती होण्यासाठी तंजावर नक्की दाखवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विश्वास पाटील म्हणाले, ॲड. पाटणे यांनी लिहिलेले हे पुस्तक आजची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. तंजावर म्हणजे यशाची, परंपरेची गुढी आहे. तिला तोड नाही. मराठी आणि त्यांचा दक्षिणेवरचा प्रभाव हा नेहमीच संशोधनाचा विषय आहे. शहाजीराजे भोसले घराण्याचा इतिहास त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांसमोर मांडला. इतिहासात तंजावरचे महत्त्व मोठे असून हा इतिहास जपण्याचे मोठे काम ॲड. पाटणे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. आपण सर्वच छत्रपतींवर प्रेम करतो. म्हणून केवळ त्यांचे स्मारक बांधून चालणार नाही तर छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, सरफोजीराजे कोण होते हा इतिहास जाणला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने शिवप्रेमी म्हणून घेऊ. हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तरापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत श्री. पाटील यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले.
ॲड. पाटणे म्हणाले, दूरदर्शी, विद्वान सरफोजीराजांनी तंजावरमध्ये मराठीचा झेंडा फडकवित ठेवला त्यांची ओळख महाराष्टातील मराठी जनतेला होण्यासाठी आपण या पुस्तकाकडे वळलो. सरस्वती महालातील १७ भाषांमधील ३ लक्ष ग्रंथ आपण जतन केले पाहिजेत. सरस्वती ग्रंथालयातील समृद्ध वारसा आपण टिकवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी